आशियातील सर्वात श्रीमंत नागरी संस्था म्हणजे BMC अर्थात बृहन्मुंबई महानगरपालिका. या महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी जी धडधड चालते ती एखादवेळेस आमदारांच्या निवडणूकांच्या वरचढ ठरणारी दिसून येते. तर याच BMC वर यावेळी झेंडा कोण फडकवणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. शिंदे गट विरूध्द ठाकरे गट कोणाची रणनीती कशी असेल? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात. मुंबईतील निवडणूकांच्या तयारीला वेग आला आहे. राज्य आयोगाकडून आत्तापर्यंत 227 प्रभाग रंचनांची मंजूरी दिल्या गेली आहे. यामुळे पुढील प्रक्रिया आता लवकर पार पडणार आहेत. तर याच पार्श्वभूमीवर BMC मधे कोणते घटक महत्वाचे ठरतील? आणि ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट यांची रणनीती काय असू शकते? याविषयी एकेक पैलू समजून घेऊयात.

BMC निवडणूकांमधे इतर पक्ष निश्चित असतील परंतु मुख्य लढाई ही एका बाजूला उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट (शिवसेना) अशी लढत असणार आहे. ही लढत फक्त राजकीय नाही, तर ती मुंबईच्या अस्मितेची आणि भविष्याची लढाई आहे. यातील निर्णायक घटक ठरतील ते म्हणजे मुंबईच्या जखमांवर मीठ चोळणारे मुद्दे. बीएमसी म्हणजे मुंबईचं हृदय आहे. २०२४-२५ साली तिचं बजेट तब्बल ५९ हजार कोटींपर्यंत होतं. ज्या बजेटमधून रस्ते, पाणी, आरोग्य आणि वाहतूक या सगळ्यांवर नियंत्रण राहतं. हा आकडा केवळ भव्यदिव्य नाही तर तो मुंबईकरांच्या जिवनमानाचा आरसा आहे. या निवडणुकीत स्थानिक समस्यांवर फार मोठा भर दिला जाईल. ज्यात महापालिकेतील भ्रष्टाचार, पदाचे दुरुपयोग आणि पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावरील अभाव, असे घटक निर्णायक भूमिका बजावतील. BEST बस सेवेत घट, तिकीट वाढ आणि काही नगरसेवकांचे भ्रष्टाचारी काम या मुद्यांवरून ठाकरे गट शिंदे गटाला चांगलाच घेरतो आहे. दुसरीकडे, शिंदे गटाचा दावा असा असतो कि, उद्धव ठाकरे काळात अनेक प्रगतीचे प्रकल्प थांबले, अनेक ठिकाणचा निधी दुसरीकडे वळवला गेला, ज्यामुळे मुंबई आज मागे पडली.
▪️या निवडणुकीत मतदारसंरचना आणि मतदारांची बदलती आकडेवारी सुद्धा महत्वाचे घटक आहेत. मुंबईत मराठी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. तसंच गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारही काही भागात निर्णायक ठरू शकतात. सोबतचं गेल्या एक वर्षापासून लाखोंच्या संख्येने नव्या मतदारांची भर पडली आहे. या नव्या मतदारांचा फायदा कोणाला होणार? हे पाहणं निर्णायक राहिलं.
▪️काही महत्वाच्या घटकांच एकादिशेत समर्थन करणं शिंदे गटाला महागात पडू शकतं. जसं कि, शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी ही तिसरी भाषा अनिवार्य करण्याचा महायुतीचा प्रयत्न आणि त्यावर शिंदेंना बराच काळ पाळलेलं मौन.
▪️ गठबंधनं आणि त्यांचा प्रभाव कसा पडेल?
ठाकरे-राज ठाकरे एकत्र आले तर मराठी मतदारांमध्ये मोठं ध्रुवीकरण शक्य आहे. उद्धव ठाकरे यांनी दसऱ्याच्या रॅलीत जाहीर केलं होतं, “भाजप हा अमीबा आहे – कुठेही शिरतो आणि नुकसान करतो.”
त्यांच्या भाषणांमध्ये “मराठी अस्मिता”, “मुंबईचा सन्मान” आणि “भ्रष्टाचारविरोधी मोहीम” हे शब्द कायमचे येतात. याचसोबत त्यांच्याकडून एक भावनिक बाजू स्पष्ट होते ती म्हणजे, “मुंबई ही मराठी माणसाची”, ज्यातून अस्मितेची भावना उभी राहते.
परंतु दुसरीकडे शिंदे गट चांगल्याच तयारीला लागल्याचं दिसून येतं. शिंदेंच्या गटात स्थानिक समस्या सोडवण्यावर ठाणे पॅटर्नमध्ये भर देण्यात आला आहे. विविध समाजघटकांशी जोडून त्यांच्या समस्या सोडवणे हा मुख्य मुद्दा ठाणे पॅटर्नचा आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेच्या बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. अतिशय सूक्ष्म नियोजन ठाणे पॅटर्नचे असते. त्यामुळे थेट नागरिकांशी संपर्क साधून स्थानिक समस्या सोडवण्यात येत आहेत. ठाण्यातील शिंदेंची ही रणनिती आता मुंबईत राबवली जाणार आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्ष नेत्यांसोबत बैठका घेऊन त्यांना जबाबदाऱ्या वाटल्या आहेत. हे नेते आतापासूनच कामाला लागले आहेत. ठाण्यातील विविध विकास कामे उदाहरणार्थ पाणी पुरवठा योजना, कचऱ्याचे वर्गीकरण, त्याची विल्हेवाट आदी योजना यशस्वी ठरल्या आहेत. हाच ठाणे पॅटर्नमुळे स्थानिक पातळीवर शिंदेचे संघटन मजूबत आहे.
शिंदे गटाला ठाणे, कल्याणसारख्या भागांमध्ये मजबुती आहे; पण मुंबईत अजूनही ठाकरे गटाचं जनाधार जास्त असल्याने ही निवडणूक त्यांच्यासाठी कसोटी ठरेल. ही निवडणूक म्हणजे दोन विचारांची लढाई आहे, ज्याचा मुळ चेहरा आता “अस्मिता विरुद्ध विकास.” असा रंगवला जात आहे. ठाकरे गट मराठी अभिमानावर आधारलेला भावनिक मुद्दा मांडतो आहे, तर शिंदे गट विकास आणि शासनक्षमतेचं स्वप्न दाखवतो आहे. तर मंडळी एकुणचं BMC निवडणूकांमधे कोण वरचढ ठरेलं तुमचं मत काय आहे? कमेंट करून नक्की कळवा.


