नुकतचं मंत्री योगेश कदमांमुळेच निलेश घायवळच्या भावाला शस्त्र परवाना मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीत पोलिसांच्या विरोधानंतरही सचिन घायवळला हा परवाना देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेकडे पाहिलं तर याआधी वाळू माफिया आणि अवैध पद्धतीने डान्स बार सुरू ठेवण्याच्या गुन्हे क्षेत्रात योगेश कदमांच नाव पुढे आलं होतं. या गोष्टींमुळे आपल्यापुढे अनेक प्रश्न निर्माण होतात, ज्यांचं खात सामान्यांच्य रक्षणासाठी असायला हवं त्याच खात्यावरील मंत्री गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा देत आहेत. मंत्री योगेश कदमांच्या या प्रकरणांविषयीचा सविस्तर आढावा जाणून घेऊयात.

गेल्या जुलै ते ऑक्टोबर या तीन ते चार महिन्यातचं गृहराज्यमंत्री योगेश कदम वेगवेगळ्या गुन्ह्यात अप्रत्यक्षपणे का असेना पण सामिल असल्याचे पुढे येत आहे. या घटनांमुळे सुरक्षा व्यवस्थेवर अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतात. गृहराज्यमंत्री जर अशा गोष्टींमधे वारंवार पुढे येत असतील तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी थेट त्यांना राजिनामा का घेऊ नये? हादेखील सवाल उपस्थित होतो. तर आजच्या भागात आपण गृहराज्यमंत्री योगेश कदमांवरील आरोप व त्यातील गोष्टी जाणून घेऊयात. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री आणि महसूलमंत्री योगेश कदम हे शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत. अलीकडील काळात त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आहेत, ज्यात निलेश घायवळ टोळीशी संबंधित सशस्त्र बंदुक परवाना, नातेवाईकांच्या नावावर अवैध डान्स बार परवाने आणि वाळू माफिया प्रकरणाचा समावेश आहे.
त्यातील पहिलं प्रकरण ताजं आहे. निलेश घायवळ टोळीला सशस्त्र बंदुक परवाना. एक मोठा वाद सध्या उफाळून आला, जेव्हा उघड झाले की योगेश कदम यांनी गुंड निलेश घायवळ याच्या भावाचा, म्हणजेचं सागर घायवळ याचा, सशस्त्र बंदुक परवाना मंजूर केला होता. निलेश घायवळ हा पुण्यातील कुख्यात गुंड असून, तो परदेशात फरार आहे. पुणे पोलिसांनी ५ ऑक्टोबरला त्याच्या कोथरूड येथील घरी छापा टाकला होता, ज्यातून बुलेट्स आणि जमिनीच्या कागदपत्रांचा साठा सापडला. घायवळ याच्यावर शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. यावर कदम यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, परवान्याची अर्जाची प्रक्रिया २०२४ मध्ये सुरू झाली होती आणि त्या वेळी सागर घायवळवर कोणताही गुन्हा दाखल नव्हता. परंतु जरी हे मान्य केलं तरी तो एका गुंडाचा भाऊ आहे? हे माहित असूनदेखील परवाना देणं ही बाब न पचण्यासारखी आहे. याच मुद्यावरून विरोधकांनी योगेश कदमांवर ‘गुंड्यांना संरक्षण’ देता म्हणत जोरदार टीका केली आहे. निलेश घायवळ हा कुख्यात गुंड गेल्या काही दिवसात पुन्हा चर्चेत आला होता कारण त्याच्या टोळीने कोथरूड परिसरातील सागर साठे नावाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला केला होता. त्याच रात्रीत या टोळीने प्रकाश धुमाळ या व्यक्तीवर देखील गोळीबार केल्याची घटना घडली होती. अर्थात या दोन्ही गुन्हेगारी घटना पाहिल्या तर ज्या सहजतेने गृहराज्यमंत्री योगेश कदम हे सांगत आहेत की, परवाना देताना संबंधित व्यक्तीवर गुन्हा नव्हता तितकी ही बाब सहज निश्चितचं नव्हती.
जुलै २०२५ मध्ये अनिल परब यांनी कदम यांच्या आई, ज्योती रामदास कदम यांच्या नावावर कांदिवलीतील ‘सावली बार’ चा परवाना असल्याचा आरोप केला. हा बार कथितरित्या ऑर्केस्ट्रा परवान्याच्या आडोशाला अवैध डान्स बार म्हणून चालवला जात असल्याचे सांगितले. २२ जुलैला पोलिसांनी छापा टाकला, ज्यात अश्लील कृत्ये उघडकीस आली. परब यांनी कदम यांच्या राजिनाम्याची मागणी केली आणि हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेले. परंतु या मुद्यावर कदाचित योगेश कदमांनी पळवाट शोधली. कदम यांनी हे आरोप फेटाळत सांगितले की, बारमध्ये फक्त ऑर्केस्ट्रा आणि वेट्रेस परवाना आहे, डान्स बार नाही. ऐन त्याचवेळी डान्स बारप्रमाणेच जुलै २०२५ मध्ये अनिल परब यांनी कदम यांना रत्नागिरीतील अवैध वाळू उत्खनाशी जोडले होते. परब यांच्या म्हणण्यानुसार, कदम यांच्या जवळच्या सहायकाचा वाळू माफियाशी संबंध असून, कदम यांनी महसूल विभागावर दबाव टाकून तपास रोखला होता. या सर्व प्रकरणातील गोष्टी पाहिल्या तर गृहराज्यमंत्री हे स्वत:च अप्रत्यक्षरित्या का असेना गुन्हेगारी प्रवृत्तीला बढावा देत असल्याचेच प्राथमिकरित्या दिसून येत आहे. या सर्व बाबींविषयी तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की कळवा.



