मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा…!!
कुसुमाग्रजांची ही कविता पुरात आपलं घर वाहून गेलेल्या एका गरीब पण स्वाभिमानी माणसाच्या प्रसंगातील प्रेरणेची अन लढण्याची शक्ती देणारी गोष्ट सांगते. आज नेमकी इतकीच बिकट परिस्थिती मराठवाड्यावर आलेली पहायला मिळते आहे. मुलांच्या शाळेचं दप्तर, वह्या पुस्तके वाहून गेल्यानंतर हुंदका देऊन रडलेली आई, संसार – गोठ्यातली गाई गुरं पुरात वाहून गेल्यानंतर जगण्यात त्राण राहिला नाही म्हणणाऱ्या आजीबाई, मराठवाड्यातील एकुण एक व्यक्तीच्या वेदनेची तीव्रता जाणवून देतात. मराठवाड्यातील पुराने केलेल्या नुकसानाने नेमकं काय गमावलं? याविषयीची माहिती जाणून घेऊयात.

मराठवाडा महाराष्ट्राचा असा भाग जो सहसा कोरड्या दुष्काळासाठी ओळखला जात असायचा पण अचानक या वर्षी सर्व चित्र पालटलं. मराठवाड्यात पावसानं घातलेलं थैमान इतकं भीषण ठरलं आहे कि त्याची झळ अन तीव्रता शब्दात क्वचितचं व्यक्त करता येईल. तब्बल दीडशे पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. काही माणसं पुरात वाहुन गेली आहेत. ६० पेक्षा अधिक गावांचा संपर्कसुद्धा तुटला आहे. जमिनी – शेती उद्ध्वस्त झाल्यानं कित्येकांचे संसार अक्षरशः रस्त्यावर आले आहेत. एक दोन रात्रीतचं अनेकांच्या आयुष्यातल्या ऊजेडाचा थेट अंधार झाला. एकट्या निमगावातचं जवळपास ६० घरांमधे पाणी शिरल्याने भयंकर नुकसान झालं आहे. महापुराच्या या गंभीर प्रलयानं बळीराजाला पुर्णत:च उद्ध्वस्त करून सोडल्याचं पहायला मिळालं आहे. शेतात फक्त दुर पर्यंत पाणीच पाणी झालेलं आहे… कांदा, सोयाबीन त्याचसोबत ऊसाचं पिकसुद्धा पुर्णत: झोडपून निघाल्यानं अफाट नुकसान झालं आहे.
मराठवाड्याला यंदा पावसाने कठोरपणे झोडपलं. ज्यामुळे अनेकांचा संसार मोडून पडला. शिवाय सोलापूरमधील काही दृष्ये अगदी मन सुन्न करून जाणारी आहेत. शेती, पीके तर उद्ध्वस्त झालीचं पण घराघरात केवळ चिखल झाला असं चित्र पहायला मिळालं. निमगावातील एका वृद्ध दाम्पत्याच्या घरातही पाणी शिरलं आणि मोठं नुकसान झालं. घरभर पाणी, धान्य वाहून गेलं, घरातला सिलेंडर समोर तरंगतोय… हे दृष्य डोळ्याने पाहताना एक म्हातारा वृद्ध अक्षरशः धाय मोकलून रडताना दिसला. सोलपुरातील निमगाव येथील 65 वर्षीय शेतकरी भारत गोवर्धन शिंदे आणि त्यांची पत्नी कौशल्या भारत शिंदे. दोन एकर शेतीवर त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची लग्नं केली आणि आपला घराचा गाडा ते हाकत आहेत. मात्र मंगळवारी, निमगाव गावात जे गेल्या 50 वर्षांत घडलं नाही ते घडलं. सीना नदीला आलेल्या पुरामुळे आख्ख्या घरात कमरे इतकं पाणी शिरलं. त्यामुळे वयोवृद्ध शिंदे दाम्पत्य जीव वाचून घराच्या बाहेर पडले. दुसऱ्या दिवशी ते घरात गेले तेव्हा घरात होत्याच नव्हतं झालं. घरातील संपूर्ण साहित्य पाण्याने मातीमोल झालं. हे पाहून वयोवृद्ध दाम्पत्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरू झाल्या.

मराठवाड्यात परभणीत झालेल्या वादळी पावसामुळे पारंपरिक पिकांसह नगदी पिकंसुद्धा यंदाच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातून हिरावून घेतले आहेत. लातूरमधील परिस्थिती भीषण आहे. तुफान पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. रात्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे गावाचाआसंपर्क तुटला आहे. जालन्यात झालेल्या पावसाने नद्या नाले एक झालेत; शेती पिकं पाण्याखाली बुडाली आहेत. आज मराठवाड्याच्या प्रत्येक गावागावातून, घराघरातून, शेतीच्या प्रत्येक शिवारातून फक्त एकच आवाज उमटतो आहे, “आम्हाला सोडू नका, आमच्या पाठीशी फक्त उभे राहा”. ज्या हातांनी धरती आईला पोसवलं, ते हात आज हतबल झालेत. पण हाच क्षण आहे सगळ्यांनी मराठवाड्याच्या पाठीशी उभे राहून, लढ, अजूनही सगळं संपलेलं नाही म्हणण्याचा…!!

