फडणवीस यांच्या तुम्ही घाण करा आम्ही पोसतो या प्रकारच्या धोरणामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय प्रतिमेवर वारंवार डाग लागतो आहे. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राचे राजकारण हे केवळ वादांचे रिंगण ठरलेलं वारंवार पहायला मिळालं आहे. गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या केवळ जयंत पाटील यांच्यावरील गलिच्छ शब्दांचाच नाही तर त्याहीपलीकडे जाऊन वारंवार होत असणाऱ्या असभ्य राजकारणाचा नेमका छुपा हेतू काय?

महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस हे अनुभवी आणि धूर्त नेते मानले जातात. मात्र त्यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षातील काही नेते ज्यात नितेश राणे, गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके यांच्यासारख्या फळीचा समावेश होतो, ही मंडळी वारंवार वादग्रस्त विधानं करून राजकीय मर्यादा ओलांडतात. हे नेते प्रभावी पदांवर असूनही गलिच्छ भाषेत टीका करतात. त्यामुळे महायुती सरकारची प्रतिमा धोक्यात येते. परंतु असं असूनही फडणवीस त्यांना का संरक्षण देतात? यामागील राजकीय खेळी काय आहे? आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रतिमेवर याचा कसा परिणाम होतो? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
तिघेही भाजप नेते कट्टर हिंदुत्ववादी आणि जातीय राजकारणाशी जोडलेले दिसून आले आहेत. त्यांच्या विधानांमुळे सतत वाद होतात. तरीही फडणवीस त्यांच्या विरोधात ठोस कारवाई करत नाहीत. नितेश राणे हे तर मत्स्यव्यवसाय मंत्री असून सतत वादग्रस्त विधानं करतात. गेल्या काही दिवसांपुर्वीच केरळविरोधी वक्तव्यामुळे त्यांचा राजीनामा मागण्यात आला होता. त्याखेरीज नागपूरमधे उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवरसुद्धा त्यांनी हिंसक विधानं केली होती. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असतानाही ते मंत्री आहेत. फडणवीस त्यांना केवळ सार्वजनिक फटकार देतात, पण कृती अजूनही का करत नाहीत? हा प्रश्न पडतो.
गोपीचंद पडळकर आरक्षण आणि जातीय मुद्द्यांवर आक्रमक आहेत. त्यांनी नुकतचं जयंत पाटील यांच्या वडिलांबद्दल अपमानास्पद विधान केले. त्यामुळे सांगलीत आंदोलनंही सुरू झालं आहे. त्यांनी ख्रिश्चन समाजाविरोधातही मागेच भडकावणारे वक्तव्य केले होते. या सर्व गोष्टी असूनही फडणवीसांनी त्यांना “अयोग्य” म्हटले, पण कारवाई काही केल्या केली नाही.
त्यानंतर येतात ते लक्ष्मण हाके हे ओबीसी नेते असून मराठा आरक्षणविरोधात आक्रमक आहेत. त्यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर टीका करत अपमानास्पद भाषा वापरली आहे. पुण्यात आंदोलकांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यांचा दारू पिऊन वादग्रस्त व्हिडिओही चर्चेत आला. त्यांनी माळी समाजाविषयी केलेल्या विधानांमुळेही वाद झाले. तरीही ते वारंवार मिडियात असतात कोणीही कारवाई करत नाही.
या नेत्यांची भाषा वैयक्तिक आणि जातीय अपमान करणारी असते. त्यामुळे विरोधक भाजपला “गुंडा राजकारण” करणारा पक्ष म्हणतात. फडणवीस या नेत्यांना सार्वजनिक फटकार देतात, पण प्रत्यक्षात त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. यामागे राजकीय गणित आहे. कट्टर हिंदुत्ववादी नेते पक्षाच्या मूळ मतदारांना आकर्षित करतात. मराठा-ओबीसी तणावाच्या पार्श्वभूमीवर हे नेते भाजपला पोलरायझेशनचा फायदा करून देतात. त्यामुळे फडणवीस त्यांना पाठीशी घालतात. त्यांच्यासाठी हे नेते विरोधकांना धडक देणारे “आक्रमक शस्त्र” आहेत.
निवडणुकांनंतर सरकार स्थिर ठेवण्यासाठी हा धुरळा उपयुक्त ठरतो. परंतु अशा गलिच्छ भाषेमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होते. छत्रपतींची संस्कृती असणाऱ्या आणि सभ्यतेच्या राज्याला मात्र “गुंडागर्दीचे राज्य” अशी ओळख मिळते. अशा प्रकारच्या वैयक्तिक, धार्मिक आणि जातीय वाद भडकावणाऱ्या विधानांमुळे महाराष्ट्र थेट असहिष्णू ठरतो. त्यामुळे गुंतवणूक, पर्यटन आणि राज्याची राष्ट्रीय प्रतिमासुद्धा धोक्यात येते. देवेंद्र फडणवीस नेमक्या या अशा प्रकारच्या गलिच्छ राजकारणातून काय साध्य करू इच्छितात? तुम्हाला याबाबत नेमकं काय वाटतं? तुमचं मत कमेंट करुन आम्हाला नक्की कळवा.

