महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठे उलथापालथ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेते धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याने आपल्या पदाचा राजीनामा देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
कोल्हापूरऐवजी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाल्याने नाराजी?
हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्याचे मोठे राजकीय वजनदार नेते आहेत. पालकमंत्री पदाच्या वाटपावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती, मात्र सरकारने त्यांना कोल्हापूरऐवजी 600 किलोमीटर दूर असलेल्या वाशिम जिल्ह्याची जबाबदारी दिली.
त्यामुळे त्यांना सातत्याने वाशिम आणि कोल्हापूर असा मोठा प्रवास करावा लागत होता. ही गोष्ट त्यांच्यासाठी अडचणीची ठरत होती. परिणामी, त्यांनी स्वतःच्या नाराजीचा इशारा दिल्यानंतर अखेर वाशिमच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला.
अजित पवार गटातील वातावरण तापले!
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. त्यातच हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्यामुळे पक्षात गोंधळ अधिक वाढण्याची शक्यता आहे. काही कार्यकर्त्यांनी हा राजीनामा पक्षांतर्गत नाराजीचा परिणाम असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी यामागे वेगळे राजकीय गणित असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
आता पुढे काय?
हसन मुश्रीफ यांचा हा निर्णय भविष्यात काय परिणाम करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अजित पवार गटामध्ये आणखी काही नेते राजीनामा देणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.



