मुंबई: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा पेच अखेर सुटला असून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा राज्याची धुरा सांभाळणार आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी यांनी ही प्रक्रिया पार पाडली.
चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला पंकजा मुंडे, आशिष शेलार, आणि रविंद्र चव्हाण यांनी अनुमोदन दिले. विधीमंडळ गटनेते म्हणून फडणवीस यांची निवड जाहीर करण्यात आली. बैठकीसाठी भाजपच्या सर्व आमदारांची उपस्थिती महत्त्वाची ठरली.
शपथविधीसाठी महायुती सज्ज
महायुतीच्या नेत्यांनी सत्तास्थापनेसाठी तयारी सुरू केली असून राज्यपालांची भेट घेऊन अधिकृत दावा केला जाणार आहे. यावेळी सरकार स्थापनेत महायुतीतील घटक पक्षांना मिळणाऱ्या वाट्याबाबतही चर्चा होणार आहे.
शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर मोठ्या थाटामाटात होणार आहे. पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी महायुतीचे दोन्ही उपमुख्यमंत्रीही शपथ घेतील.



