पिंपरी चिंचवड, दि. ३ (प्रतिनिधी) – रायगड येथील अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने येत्या गुरूवारी दि. ५ व शुक्रवारी दि. ६ रोजी रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. लोकोत्सव सार्वभौम स्वराज्याचा आणि जागर शौर्यभक्तीचा अशा या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
शिवरायांचा ६ जून १६७४ ला रायगडावर राज्याभिषेक झाला.या ऐतिहासिक क्षणाची स्मृती सदैव राहवी, या हेतूने प्रतिवर्षी ६ जूनरोजी रायगडावर मोठ्याया प्रमाणात शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे यावर्षी रायगडावर ५ व ६ जून रोजी समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होत आहे. गुरुवारी दि. ५ रोजी दुपारी ३.३० वाजता पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस अभिवादन करून शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ होईल. नाणे दरवाजाजवळून दुपारी ४ वाजता युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांचे स्वागत व शिवभक्तांसमवेत पायी गड चढण्यास प्रारंभ होईल. नंतर नगाराखाना येथे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती व रायगड जिल्हा प्रशासन यांच्या उपस्थितीत गडपूजन होईल. नतर होळीचा माळ येथे युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती महाराज यांच्या हस्ते ‘धार’ तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची या युद्धकलेच्या प्रात्यक्षिकास प्रारंभहोईल. त्याचठिकाणी सायंकाळी ७ वाजता ढोलवादन, लेझीम प्रात्यक्षिके व वारकरी संप्रदायाकडून टाळ मृदंगाचा गजर होणार आहे.नंतर रात्री ८ वाजता राजसदरेवर ‘जागर शिवशाहिरांचा’ स्वराज्याच्या इतिहासाचा कार्यक्रम होईल. शिरकाई मंदिरात रात्री ९ वाजता गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ होईल त्यानंतर जगदीश्वर मंदिरात वारकरी संप्रदायाकडून कीर्तन व भजन होणार आहे.युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे हस्ते हस्ते शुक्रवारी दि. ६ रोजी सकाळी ७ वाडता पारंपरिक वाद्यांच्या गजरात नगारखाना येथे ध्वजपूजन व ध्वजारोहण होईल राजसदरेवर सकाळी ७.३० वाजता शाहिरी कार्यक्रम होईल. श्री शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे राजसदरेवर सकाळी ९.३० वाजता आगमन होईल. युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे राजसदरेवर सकाळी ९.५० वाजता आगमन होईल. युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या हस्ते सकाळी १० वाजता श्री शिवछत्रपती महाराजांच्या उत्सवमूर्तीस अभिषेक, श्री शिवछत्रपती महाराजांच्या राजसदरेवरील सिंहासनारूढ मूर्तीस सुवर्ण मुद्रांचा अभिषेक होईल.नंतर सकाळी १०.२० वाजता युवराज संभाजी छत्रपती महाराज यांचे शिवभक्तांना संबोधन झाल्यावर सकाळी १०.३० वाजता सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा शिवराज्याभिषेक पालखी
सोहळ्यास प्रारंभ होईल. श्री शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे जगदीश्वर मंदिर येथे सकाळी ११ वाजता आगमन झाल्यावर दुपारी १२.१५ वाजता युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्याकडून वारकरी संप्रदायास पंढरीच्या वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान करण्यात येईल. दुपारी १२.२५ वाजता श्री शिवछत्रपती महाराजांच्या समाधीस अभिवादन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शिवभक्तांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहवे, असे आवाहन विश्वास काशीद, प्रशांत जाधव रोहित जाधव यांनी केले आहे.



