वेल्हे : ना.मा. श्री. अजितदादा पवार (पालकमंत्री, पुणे जिल्हा तथा उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भोर-राजगड-मुळशी विधानसभेचे आमदार शंकर हिरामण मांडेकर यांच्या पुढाकारातून वेल्हे (राजगड) तालुक्यातील अनुशंकर मंगल कार्यालय, आंबी फाटा, पानशेत रोड येथे “शासन आपल्या दारी” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
या उपक्रमाला वेल्हे तहसील अंतर्गत १४०० पेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवा, योजना, दाखले, प्रमाणपत्रे व तक्रार निवारण यांसारख्या सुविधा थेट त्यांच्या दारी मिळाल्या. नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्या तत्काळ सोडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांचे अधिकारी एकत्र उपस्थित होते.
कार्यक्रमात भोर उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, वेल्हे उपविभागीय अधिकारी महेश हरिश्चंद्रे, तहसीलदार श्रीनिवास ढोणे, गटविकास अधिकारी पंकज शेळके, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किरण राऊत, माजी सदस्य अमोल नलावडे, माजी अध्यक्ष भगवान पासलकर, अनंता दारवटकर, किर्तीताई देशमुख, सुनील जागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमातून शासकीय यंत्रणा अधिक सक्षमपणे लोकांपर्यंत पोहोचत असून “शासन आपल्या दारी” ही संकल्पना यशस्वी ठरत आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाचे स्वागत केले आणि समाधान व्यक्त केले.



