मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असून, यात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. वाल्मिक कराडने अवादा कंपनीकडून सहा वेळा खंडणीची मागणी केली होती, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. यासोबतच, संतोष देशमुख यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे देखील उघड झाले आहे.
खंडणीची मागणी कधी आणि कशी झाली?
पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, वाल्मिक कराडने अवादा कंपनीकडे एकदा नव्हे, तर तब्बल सहा वेळा खंडणी मागितली होती. याचा उल्लेख अवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनिल शिंदे यांच्या जबाबात करण्यात आला आहे.
धमकी आणि कट रचल्याचा आरोप!
या हत्याकांडाच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपपत्रानुसार, सुदर्शन घुले या आरोपीने संतोष देशमुख यांना जिवे मारण्याची थेट धमकी दिली होती. त्याने “तुला बघून घेईन, तुला जिवंत सोडणार नाही,” असे सांगितल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
आरोपींना कठोर शिक्षा होण्याची शक्यता!
या प्रकरणातील आरोप गंभीर असल्याने आरोपींना कठोर शिक्षेचा सामना करावा लागू शकतो. वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांवरील गुन्ह्याचा फास आणखी घट्ट होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे आणि संपूर्ण राज्याचे लक्ष आता न्यायालयाच्या निर्णयावर आहे.



