मुंबई: महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात युवा आमदार रोहित पाटील यांनी त्यांच्या पहिल्या भाषणातच खणखणीत शैलीत आपली छाप सोडली. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांच्या निवडीनंतरच्या अभिनंदनाच्या प्रस्तावात त्यांनी लोकशाहीचं महत्त्व, आपल्या वयाचं वैशिष्ट्य, आणि राज्यातील नेतृत्वावर हलकं-फुलकं टीकास्त्र सोडलं.
लोकशाही आणि बाबासाहेबांचे योगदान:
“भारताने अनेक प्रकारच्या ‘शाह्या’ पाहिल्या, पण लोकशाही हीच आपल्या देशाची खरी ताकद आहे,” असं म्हणत त्यांनी लोकशाही व्यवस्थेच्या मूल्यांवर भर दिला. “बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या एका मताच्या अधिकारामुळे आम्ही येथे बसलो आहोत,” असे त्यांनी ठामपणे मांडले.
नार्वेकर आणि दिल्लीचा संदर्भ:
पाटलांनी त्यांच्या भाषणात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर चिमटा काढला. “तुम्ही सगळ्यात तरुण अध्यक्ष आहात, आणि मी सगळ्यात तरुण आमदार. त्यामुळे तुम्ही माझ्याकडेही लक्ष द्यायला हवे. दिल्लीतही तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे,” असा टोमणा त्यांनी मारला.
फडणवीसांसाठी “अमृतहून गोड” संदेश:
संत तुकारामांच्या अभंगाचा उल्लेख करत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना देखील संवाद साधण्याच्या शैलीसाठी विनम्र सल्ला दिला. “अमृताहून गोड नाम तुझे देवा,” या अभंगाचा संदर्भ देत त्यांनी विरोधकांशी गोड संवाद साधण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावर मुख्यमंत्री फडणवीसांच्या चेहऱ्यावर हास्य झळकले.



