Rishabh Pant May Play in Final : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडच्या फिरकीपटूंना टॅकल करण्यासाठी रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंट एक नवीन रणनीती आखत आहेत.
टीम इंडिया विजेतेपदाच्या उंबरठ्यावर!
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 9 मार्च रोजी खेळला जाणार आहे. भारताला अजून एका विजयाची गरज आहे आणि मग चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारताचे नाव कोरले जाईल. मात्र, न्यूझीलंड संघाने दमदार पुनरागमन केल्याने हा सामना भारतासाठी सोपा असणार नाही.
न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी वाढवली भारताची चिंता!
न्यूझीलंडच्या संघाने साऊथ अफ्रिकेविरुद्ध सेमीफायनलमध्ये जबरदस्त प्रदर्शन करत मोठा विजय मिळवला. त्यांच्या फिरकीपटूंनी आफ्रिकेच्या फलंदाजांना अक्षरशः गुंडाळले. कॅप्टन मिचेल सँटनर आणि रचिन रविंद्र या दोघांनी फिरकीच्या जाळ्यात आफ्रिकन संघाला अडकवले.
भारतीय संघात मोठा बदल होणार?
भारतीय संघातील बहुतांश फलंदाज उजव्या हाताने खेळणारे आहेत. याचा फायदा न्यूझीलंडच्या फिरकीपटूंना मिळू शकतो. अक्षर पटेल हा सहाव्या क्रमांकावर खेळतो, पण टॉप ऑर्डरमध्ये कोणताही डावखुरा फलंदाज नसल्याने भारतीय संघ मोठ्या समस्येत सापडू शकतो.
ऋषभ पंतला संधी मिळणार?
याच कारणास्तव, भारतीय संघ व्यवस्थापन ऋषभ पंतला अंतिम सामन्यात संधी देण्याचा विचार करत आहे. पंत हा डावखुरा फलंदाज असल्याने न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांचा प्रभाव रोखण्यासाठी तो उपयुक्त ठरू शकतो.
यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऋषभ पंतला अजून संधी मिळालेली नाही. मात्र, अंतिम सामन्यात तो केएल राहुलच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट होऊ शकतो. हा बदल फायनलच्या निकालावर मोठा प्रभाव टाकू शकतो.
फायनलमध्ये रोहितचा मास्टरस्ट्रोक?
भारतीय संघाला न्यूझीलंडला पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकायची आहे. त्यासाठी रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंट सर्वोत्तम निर्णय घेतील. ऋषभ पंतचा समावेश अंतिम सामन्यातील ‘गेम चेंजर’ ठरू शकतो. आता अंतिम सामन्यात कोणता निर्णय घेतला जातो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.



