मेवाडच्या महाराणा प्रताप यांचे वंशज विश्वराज सिंह मेवाड आणि लक्ष्यराज सिंह मेवाड यांच्यातील संपत्तीच्या वादाने पुन्हा चर्चेला तोंड फोडले आहे. मंगळवारी (26 नोव्हेंबर) लक्ष्यराज सिंह यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विश्वराज सिंह यांच्यावर गुंडगिरी आणि अव्यवस्थेचे आरोप केले. यामुळे मेवाडच्या शाही कुटुंबातील वाद आणखी चिघळला आहे.
वादाची सुरुवात कुठून झाली?
मेवाडच्या राजपरिवारात संपत्ती आणि वारसदाराच्या प्रश्नावरून 1983 पासून वाद सुरू आहे. महाराणा भूपाल सिंह यांनी 1955 मध्ये एकलिंगजी ट्रस्टची स्थापना केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे दत्तक पुत्र महाराणा भगवत सिंह यांच्या मालकीत ही संपत्ती आली. भगवत सिंह यांना महेंद्र सिंह, अरविंद सिंह आणि योगेश्वरी ही तीन अपत्ये होती.
महेंद्र सिंह यांनी 1983 मध्ये आपल्या वडिलांविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी वडिलांनी संपत्ती विकण्यास सुरुवात केल्याचा आरोप केला होता. यामुळे वडिलांनी आपली संपत्ती आणि ट्रस्टची जबाबदारी आपल्या धाकट्या मुलाकडे म्हणजे अरविंद सिंह यांच्याकडे सोपवली.
महेंद्र सिंह यांना संपत्तीच्या व्यवस्थापनापासून वगळण्यात आलं. त्यांच्या मृत्यूनंतर (10 नोव्हेंबर 2024) त्यांच्या मुलाचा राज्यभिषेक पार पडला, ज्यामुळे वाद अधिक चिघळला आहे.
घटनाक्रम कसा घडला?
25 नोव्हेंबर रोजी विश्वराज सिंह यांनी समर्थकांसह चित्तोडगड येथे राज्यभिषेक विधी पार पाडल्यानंतर उदयपूर सिटी पॅलेस आणि एकलिंगजी मंदिरात प्रवेशाचा प्रयत्न केला. मात्र, एकलिंगजी ट्रस्टच्या वतीने स्थानिक वृत्तपत्रांमध्ये एक जाहीर नोटीस देऊन अनधिकृत प्रवेश रोखला जाईल असे सांगण्यात आले होते.
सायंकाळी विश्वराज सिंह समर्थकांसह उदयपूरला पोहोचले. सिटी पॅलेसच्या परिसरात पोलीस आणि समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी बॅरिकेड्स लावले, तरीही समर्थकांनी पॅलेसच्या दिशेने मोर्चा काढला. रात्री उशिरा जगदीश चौकात ठिय्या देऊन विश्वराज सिंह समर्थकांसह थांबले.
वादावर दोन्ही बाजूंची मते
विश्वराज सिंह यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, “संपत्तीचा वाद वेगळा आहे, पण मला मंदिरात जाण्यास रोखणं परंपरा आणि कायद्याच्या विरोधात आहे.”
तर लक्ष्यराज सिंह यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “मंदिर सर्वांसाठी खुलं आहे. पण हे शक्तिप्रदर्शन योग्य नाही. आम्ही न्यायालयाच्या आदेशांचं पालन करत आहोत.”



