महाविकास आघाडीत मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. समाजवादी पार्टीने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. शिवाजीनगर-मानखुर्दचे आमदार अबू असीम आझमी यांनी ही घोषणा केली असून, आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत.
महाविकास आघाडीतील मतभेद:
अबू आझमी यांनी महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव असल्याचे नमूद केले. “आघाडीतील नेते एकमेकांच्या प्रचारासाठी दिसले नाहीत. जागावाटपाच्या वेळी रस्सीखेच पाहायला मिळाली. त्यामुळे आघाडीला मतदारांवर प्रभाव टाकता आला नाही,” असे त्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या भूमिकेवर सवाल:
उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला विरोध दर्शवत आझमी यांनी “आघाडीत सर्वधर्मीय मतदारांना सोबत घेण्याचा अभाव होता,” असे सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आता निर्णय घ्यावा की त्यांना शिवसेनेसोबत पुढे जायचे आहे की नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
महाविकास आघाडीचे संख्याबळ कमी:
अबू आझमी आणि रईस शेख यांच्या बाहेर पडल्याने आघाडीचे संख्याबळ दोन आमदारांनी घटले आहे. विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आघाडीला बसलेला हा धक्का त्यांच्यासाठी मोठे आव्हान आहे.



