महायुती सरकारने महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकत्र जमा होणार आहेत. त्यामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होणार आहेत.
राज्यातील अनेक महिलांना फेब्रुवारीचा हप्ता वेळेवर मिळाला नव्हता. त्यामुळे तो कधी येणार याची उत्सुकता होती. अखेर मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की 8 मार्च रोजी हा हप्ता मिळणार आहे.
दरमहा 1500 रुपये देण्यात येणाऱ्या या योजनेत काही अर्ज निकषांमध्ये बसत नसल्याने बाद करण्यात आले आहेत. अनेक महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेतले आहेत. राज्यभरात सुरू असलेल्या छाननीत आतापर्यंत 7 लाखांहून अधिक अर्ज अपात्र ठरवले गेले आहेत.
या योजनेंतर्गत काही अपात्र महिलांमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या 2.3 लाख लाभार्थींचा समावेश आहे. तसेच, 65 वर्षांवरील 1.1 लाख महिला आणि इतर शासकीय योजनांचे लाभ घेणाऱ्या 1.6 लाख महिलांचे अर्जही बाद झाले आहेत.
महिला दिनाच्या दिवशी मिळणाऱ्या या मदतीमुळे लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारकडून हा निर्णय महिलांच्या सक्षमीकरणासाठी घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे.



