राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची मुक्ताईनगर येथे यात्रा महोत्सवादरम्यान छेडछाड झाल्याची माहिती समोर आली असून, यामुळे संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. हा प्रकार घडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त करत आरोपींना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट इशारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “या घटनेत एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. अशा गुन्हेगारांना माफी देता येणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्ते असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या प्रकरणावरून आता मोठे राजकीय वादळ उठण्याची शक्यता आहे.
एकनाथ खडसेंनी सरकारवर साधला निशाणा
या घटनेबाबत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी देखील जोरदार टीका केली आहे. “या आरोपींना राजकीय संरक्षण आहे. याआधीही आम्ही तक्रार दिली होती, मात्र आरोपींना लगेचच सोडण्यात आले. महिलांची सुरक्षितता ही सरकारसाठी दुय्यम बाब आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
घटनाक्रम कसा घडला?
मुक्ताईनगर येथे सध्या यात्रा महोत्सव सुरू आहे. याठिकाणी रक्षा खडसे यांच्या मुलीने तिच्या मैत्रिणींसह सहभाग घेतला होता. त्याच वेळी काही टवाळखोरांनी या मुलींची छेड काढण्यास सुरुवात केली. सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी थांबले नाहीत. त्यांनी सतत अश्लील शेरेबाजी केली आणि मुलींना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी सुरक्षा कर्मचारी तातडीने पोलीस ठाण्यात पोहोचले आणि तक्रार दाखल केली. काही वेळातच भाजपचे वरिष्ठ नेतेही पोलिस ठाण्यात दाखल झाले आणि पोलिसांना त्वरित कारवाईचे आदेश दिले. या दबावामुळे काही तासांतच आरोपींना अटक करण्यात आली.
महिलांच्या सुरक्षेवरून संतापाचा सूर
या घटनेनंतर संपूर्ण राज्यभर महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त केला जात आहे. एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलीचीच जर अशी अवस्था होत असेल, तर सर्वसामान्य महिलांचे काय? असा प्रश्न अनेक राजकीय नेत्यांनी उपस्थित केला आहे.
राज्यात महिलांविरोधातील गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे, जळगावसारख्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर धोरण आखण्याची गरज आहे, असे मत विविध महिला संघटनांनी मांडले आहे.



