मुंबई: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावात झालेल्या संतोष देशमुख हत्याकांडानंतर आता मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड हा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याचा आरोप होत होता. त्यामुळेच सरकारवर वाढत्या दबावामुळे अखेर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्रीच मुंडेंना मंत्रिपद सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज विधानसभेच्या कामकाजाच्या आधीच त्यांनी आपल्या पीए प्रशांत जोशी यांच्यामार्फत राजीनामा सुपूर्त केला. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.
मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश देताच राजीनामा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर काल रात्री महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह धनंजय मुंडेदेखील उपस्थित होते. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना थेट राजीनामा देण्यास सांगितले.
या बैठकीनंतर लगेचच राजीनामा लिहून घेण्यात आला आणि आज सकाळी तो मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त करण्यात आला.
वाल्मिक कराडच्या अटकेनंतर वाढला दबाव
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा जवळचा सहकारी आणि समर्थक असल्याचे आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात आले होते. कराड हा मुंडेंच्या निवडणुकीतील प्रमुख रणनीतीकार होता, तसेच त्याला राजकीय अभय मिळाल्याने तो कायद्याच्या कचाट्यातून बचावत राहिला, असे आरोप होत होते.
या प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी म्हणून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी वाढत होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी तातडीने हा निर्णय घेतला आणि राजीनामा घेतला.
पुढील राजकीय समीकरणांकडे लक्ष
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी अधिक तीव्र होईल का, यावर चर्चा सुरू आहे. तसेच, या घटनेचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता सरकार पुढील कारवाई कशी करते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


