पुणे (5 जानेवारी): महिलांच्या सशक्तीकरण आणि आरोग्य जनजागृतीसाठी आयोजित “उडान नारीशक्ती रन” आज सकाळी बाणेर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला.

चौदा हजार सहाशे महिलांच्या विक्रमी सहभागाने या उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे 81 वर्षांच्या आजींनी व सात महिन्यांच्या गर्भवती महिलेने सहभाग नोंदवत उपस्थितांना प्रेरणा दिली. महिलांच्या उत्साही सहभागामुळे या उपक्रमाची सकारात्मक ऊर्जा ठळकपणे जाणवली.
कार्यक्रमासाठी उच्चतंत्र शिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील, खासदार सौ. सुनेत्रा पवार, आमदार श्री. शंकर भाऊ मांडेकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष मा. रूपालीताई चाकणकर, तसेच सिने अभिनेत्री श्रुती मराठे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित झाला.
उपक्रमाचे यश पूनम विशाल विधाते आणि त्यांच्या टीमच्या समर्पित प्रयत्नांमुळे साध्य झाले. मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत महिलांच्या सशक्तीकरणासाठी असे उपक्रम गरजेचे असल्याचे सांगितले. या उपक्रमाने महिलांच्या आरोग्याला आणि सामर्थ्याला नवी दिशा देत एक आदर्श निर्माण केला आहे.




